अमळनेर शहराच्या शांततेसाठी जबाबदारीची जाणीव आवश्यक – संदीप घोरपडे

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहर शांत आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी येथील प्रत्येक नागरिकाची आहे. शहरातील तरुण समजदार असून, जातीय वा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही भडकाऊ वक्तव्यांना ते बळी पडणार नाहीत, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की, समाजातील वाढती हिंसक प्रवृत्ती थांबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, तरुणांना रोजगाराच्या संधी, महिलांची सुरक्षा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
त्यांनी नागरिकांना अपील केले आहे की, शहरात कोणत्याही अफवांना बळी न पडता सामाजिक शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवावे. तसेच, प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!” या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन संदीप घोरपडे यांनी केले आहे.