“वादग्रस्त वक्तव्ये टाळा!” – मुख्यमंत्र्यांकडून नितेश राणेंना तंबी..

24 प्राईम न्यूज 19 मार्च 2025
वादग्रस्त विधाने आणि मंत्री नितेश राणे हे जणू समीकरणच बनले आहे. नागपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी राणेंना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याची तंबी दिली आहे.
मंगळवारी विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात जाऊन नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील काही दिवस संयम बाळगण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मात्र, या चर्चेनंतर नितेश राणे यांनी स्पष्टीकरण देत, “मुख्यमंत्र्यांनी मला तंबी दिलेली नाही. मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. फडणवीसजींना स्नेहभोजनासाठी निमंत्रण द्यायला गेलो होतो,” असे सांगितले.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून नितेश राणेंना थेट तंबी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.