बसस्थानकात वाढत्या चोऱ्या; बंद सीसीटीव्हीमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर..

आबिद शेख/अमळनेर. शहरातील बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले, तरी त्यातील काही कॅमेरे वारंवार बंद राहत असल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे.
स्थानकात एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मात्र त्यापैकी दोन ते तीन कॅमेरे सतत बंद असल्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास करणे कठीण बनले आहे. परिणामी, प्रवाशांचे पैसे, मोबाईल, पर्स आणि बॅगा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी एका महिला प्रवाशाची सोन्याची दागिने आणि रोकड असलेली पर्स चोरीला गेली. तक्रार दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित कॅमेरे बंद असल्यामुळे कोणतीही ठोस माहिती हाती लागली नाही. अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक गस्त घालणारे कर्मचारी नियुक्त करणे, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे आणि प्रवाशांसाठी जनजागृती मोहिम राबवणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रशासनावरचा प्रवाशांचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
विशेषतः, विद्यार्थिनी आणि महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारण्याची गरज आहे.