महिलांसाठी पाणी गुणवत्ता प्रशिक्षण: गावस्तरीय पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर– राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM), जल जीवन मिशन आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर (मुख्य संसाधन संस्था – KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल गावांतील महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात गावातील निवडलेल्या महिलांना पाणी गुणवत्ता तपासणी आणि एफटीके किटच्या (Field Testing Kit) वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी मा. श्री. एन. आर. पाटील, विस्तार अधिकारी श्री. एस. एस. कठाळे, तसेच सीआरसी अधिकारी श्री. मनोहर मोरे उपस्थित होते.
महिलांना प्रशिक्षण का आवश्यक?
गटविकास अधिकारी श्री. एन. आर. पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावस्तरीय महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रशिक्षण मिळाल्यास, त्या स्वतः आपल्या गावातील पाण्याचे नमुने तपासू शकतात. शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला एफटीके किट उपलब्ध करून दिले असून, त्याचा प्रभावी वापर करून पाणी सुरक्षिततेसाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
तज्ञांचे मार्गदर्शन व सहभाग
प्रशिक्षण कार्यक्रमात जीएसडीएचे श्री. विनोद साळुंखे, एनआरआयडीचे मास्टर ट्रेनर दिनेश पाटील, एफटीके किट मास्टर ट्रेनर सौ. कल्याणी पाटील, राष्ट्रविकास संस्थेचे सचिव तुषार पाटील, संचालिका रागिणी महाले यांचा तज्ञ म्हणून सहभाग होता. त्यांनी महिलांना पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी कशी करावी, संभाव्य पाणी प्रदूषणाचे परिणाम आणि त्यावर उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षणाचा उद्देश आणि पुढील नियोजन
प्रशिक्षणादरम्यान महिलांनी एफटीके किटचा प्रत्यक्ष वापर करून जल परीक्षणाचे तंत्र शिकले. प्रशिक्षणानंतर त्या आपल्या गावातील घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणार आहेत.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान
या कार्यक्रमाचे नियोजन नयना चौधरी, सीमा महाजन, विद्या पाटील, भाग्यश्री गोसावी, ज्योती पाटील, महेश माकडे, राहुल सुर्यवंशी, स्वप्नील पाटील, हिलाल पाटील, गोरख पाटील, मुकेश पाटील, दिलीप पाटील यांनी केले. राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.
जिल्हा परिषद जळगावचे प्रकल्प संचालक (पावस्व) मा. श्री. सचिन पानझडे, पाणी गुणवत्ता अधिकारी श्री. दीपक राजपूत, एचआरडी श्री. महेश सोनवणे आणि जिल्हा जीएसडीए अधिकारी यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे गावस्तरावर महिलांना जल सुरक्षा आणि पाणी गुणवत्ता तपासणीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होता येणार असून, शुद्ध पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.