बेकायदेशीर घोडे वाहतुकीचा पर्दाफाश, दोन जण अटकेत..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथे बेकायदेशीरपणे १२ घोडे आणि एक शिंगरू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रताप महाविद्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ एका ट्रकची संशयास्पद हालचाल नागरिकांच्या निदर्शनास आली. याची माहिती मिळताच गोपनीय अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांना सूचित केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक (एमएच १९ बीएम ००२२) अडवला. ट्रक चालक अजय भाईदास भिल (वय २२, रा. बोरगाव) याच्याकडे घोडे वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्याच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ट्रकमधील १२ घोडे आणि एक शिंगरू हे शकील कासम खाटीक (वय ३६, रा. मारवड) याचे असल्याचे समोर आले.

मालकाने घोड्यांची कोंबून वाहतूक केली होती, तसेच कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता त्यांना प्रवास घडवला जात होता. यामुळे पोलिसांनी १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे १२ घोडे व शिंगरू तसेच २ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ४ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (डी) (ई) (एफ), (सी) तसेच कलम ३ (५) आणि मुंबई पोलीस कायदा ११९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!