साने गुरुजी शाळेत ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रम उत्साहात पार..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मुकेश अमृत पाटील यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाड्यावरचा चहा’ हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सहभागाने आणि संस्थेच्या आशीर्वादाने उत्साहात पार पडला.
इयत्ता 8 वीच्या मराठी अभ्यासक्रमातील पाड्यावरचा चहा या पाठाचा कृतीयुक्त अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. वर्गातील पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जात शाळेच्या मैदानात झाडांच्या आडोशाला साडी-ओढणीच्या सहाय्याने झोपड्या तयार करण्यात आल्या. दगड-विटांपासून चुली उभारून विद्यार्थिनींनी स्वतःच भाकरी, ठेचा व चविष्ठ पदार्थ तयार केले. चहा करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी विशेष उत्साह दाखवला.
संस्थेचे अध्यक्ष आबासो हेमकांतजी पाटील, सचिव दादासो संदीपजी घोरपडे व संचालक मंडळानेही या उपक्रमाला हजेरी लावून विद्यार्थिनींचे कौतुक केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनीही विद्यार्थिनींच्या पाककलेचा आनंद घेतला. अशा प्रकारे आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.