अमळनेर येथे अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकरिंच्या हस्ते संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर
३० व ३१ मार्च २०२५ रोजी अमळनेर येथे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन होणार असून, प्रसिद्ध आर्टिस्ट किरण बागुल यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी बोलीभाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने संमेलन महत्त्वाचे असल्याचे सांगत अधिकाधिक रसिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
संमेलन संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी बोधचिन्हाच्या संकल्पनेबाबत माहिती देताना सांगितले की, यात खानदेशाच्या मातृदैवत कानबाईचे चित्रण असून, अहिराणी भाषेचे प्रतीक म्हणून ‘अ’ अक्षर हिरव्या रंगात दर्शवले आहे, जे कृषी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते.
संमेलनात शोभायात्रा, कथा, कविता, गीते, नाटिका, परिसंवाद आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अशोक पवार यांनी हे संमेलन खानदेशवासीयांसाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरेल, असे मत व्यक्त केले.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी अमळनेरमधील संस्था, संघटना व कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे समन्वयक रणजित शिंदे यांनी सांगितले.