पाडळसरे धरणात येत्या दोन वर्षांत पाणी अडवले जाणार – मुख्य अभियंत्यांची माहिती..

0

आबिद शेख/ अमळनेर. तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाला गती देण्यात येत असून, येत्या दोन वर्षांत धरणात पाणी अडवले जाईल, असे आश्वासन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी दिले.

जळगाव येथे महामंडळाच्या दालनात झालेल्या बैठकीत पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टाय प्लेट धरणस्थळी पोहोचले असून, गेटसाठी आवश्यक गर्डर बसविण्याचे काम वर्कशॉपवर सुरू आहे. यंदा उपलब्ध निधी जूनपर्यंत खर्च करण्याचे नियोजन असून, पुढील वर्षी निधी मिळाल्यास दोन वर्षांत महाकाय गेट उभे राहतील व धरणात पाणी साठवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धरणाच्या कामासोबत उपसा सिंचन योजना, पाईपलाइन आणि पंपिंग स्टेशनचे कामही समांतर सुरू आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निधी फक्त धरणासाठीच वापरण्याची मागणी केली. तसेच, पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. निधीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने योजनेत समावेश तातडीने व्हावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही समितीने दिला.

बैठकीस समिती प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, सुनिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता बोरकर यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!