अमळनेरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची चेतावणी – पो.नि. बारबोले

शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांचा कडक इशारा, सोशल मीडियावर देखरेख वाढणार
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या अमळनेर शहरात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण तयारीत आहे. कुणीही जातीय विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक केदार बारबोले यांनी दिला.

शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गांधलीपुरा पोलीस चौकीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकार संजय पाटील, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत, अॅड. शकील काझी, उमेश धनराळे, इम्रान खाटीक, आरिफ भाया यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना पो.नि. बारबोले म्हणाले की, “दंगलीत कुणाचाही फायदा होत नाही, तर समाजाचे मोठे नुकसान होते. समाजकंटक अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपण बळी पडू नका. शहरातील शांतता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.”
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पीएसआय भगवान शिरसाठ यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी संजय पाटील यांनी आभार मानले.