बजाज ऑटो व टाटा Strive तर्फे BMS प्रमाणपत्र कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर येथे बजाज ऑटो लिमिटेड व टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रशिक्षण उपक्रमात संस्थेच्या इलेक्ट्रिशियन व फिटर विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी 30 विद्यार्थ्यांनी कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला.
कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बजाज कंपनीतर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि बॅच बिल्ला प्रदान करण्यात आला. हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सचिन करारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर आणि विजय चौधरी सर यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.