अमळनेर येथे ३०-३१ मार्चला राज्यस्तरीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथे ३० व ३१ मार्च रोजी राज्यस्तरीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन संपन्न होणार असून, यामध्ये सुप्रसिद्ध लोककवी, लेखक, विचारवंत, नाट्यकलाकार, मिमिक्री आर्टिस्ट तसेच एकपात्री नाटककार सहभागी होणार आहेत.
साहित्य संमेलनाची भरगच्च कार्यक्रमपत्रिका आयोजकांनी जाहीर केली असून, यामध्ये प्रसिद्ध सिनेगीतकार व पार्श्वगायक प्रशांत मोरे यांच्या अहिराणी कविता आणि गाणी, तसेच अहिराणी शब्दकोश आणि ओवीकोष यावर डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे विवेचन होईल. नाट्य अभिनेता हर्षल पाटील यांचे नाट्य अभिवाचन, सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट विलासकुमार शिरसाठ यांची अहिराणी मिमिक्री, विजय पवार आणि प्रविण माळी यांचे एकपात्री नाट्य यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीने होणार आहे. उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, IAS अधिकारी राजेश पाटील, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत उपस्थित राहतील.
पहिल्या दिवशी संध्याकाळी काव्यमैफिल, अहिराणी ओव्या, खानदेशी गाणी, कानबाई नृत्य, एकपात्री नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी अहिराणी भाषा, संस्कृती, विचार या विषयावर परिसंवाद होणार असून, नामवंत अहिराणी अभ्यासक आणि साहित्यिक आपले विचार मांडतील. कथाकथन सत्रात सुप्रसिद्ध कथाकार एस.के. पाटील, प्राचार्य संजीव गिरासे, गोकुळ बागुल, वृषाली खैरनार आदींचे सहभाग असेल.
दुपारच्या सत्रात तहसीलदार सुदाम महाजन यांचा ‘अहिराणी झटका’ तसेच प्रसिद्ध कवींची काव्यमैफिल रंगेल. संमेलनाचा समारोप माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शरद पाटील, बी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.