अमळनेर नगरपरिषदेकडून सेवानीवृत्त सफाई कामगारांच्या थकीत देयकांबाबत कार्यवाहीचे निर्देश..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेतील सेवानीवृत्त सफाई कामगारांना २०१६ पासून प्रलंबित ग्रॅज्युटी, रजा रोखीने व इतर थकीत रक्कम तसेच कायमस्वरूपी सफाई कामगारांचे वैद्यकीय बिल आणि कालबाह्य पदोन्नतीसंदर्भातील थकीत देयके मिळावीत, यासाठी संबंधित संघटनांनी वारंवार मागणी केली आहे.
सफाई कामगारांच्या हक्काच्या देयकांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, तसेच नगरपालिका कामगार युनियन, अमळनेर यांनी नगरपरिषदेकडे निवेदन सादर केले आहे. यासंदर्भात सहायक आयुक्त, न.वि.शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी नगरपरिषदेशी पत्रव्यवहार करत त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहेत.
नगरपरिषदेस या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कामगारांना थकीत रक्कम तातडीने वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
सफाई कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधत संघटनांचे पदाधिकारी श्री. रघुनाथ मोरे, श्री. विदुकुमार सोनवणे, श्री. मुकेश बिहाडे, श्री. रुपचंद पारेख आणि श्री. विनोदभाऊ जाधव यांनी या प्रकरणात पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
सफाई कामगारांना त्यांचे थकीत हक्काचे पैसे आणि अन्य देयके लवकरच मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.