थायलंड, म्यानमारमध्ये महाभूकंप: १५० हून अधिक ठार, ७५० जखमी

24 प्राईम न्यूज 29 मार्च 2025
थायलंड आणि म्यानमारला शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता ७.७ रिश्टर स्केल क्षमतेच्या महाभूकंपाचा तडाखा बसला. या विनाशकारी भूकंपात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ७५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्यानमारमध्ये मोठी हानी, आणीबाणी जाहीर म्यानमारमध्ये आतापर्यंत १४४ जणांचे मृतदेह सापडले असून, भूकंपामुळे देशातील सहा राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या मोठ्या शहर मंडालेजवळ होता. मुख्य धक्क्यानंतर ६.४ रिश्टर क्षमतेचा दुसरा धक्का बसला.
थायलंडमध्ये इमारत कोसळली, ८० बेपत्ता थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक निर्माणाधीन बहुमजली इमारत भूकंपामुळे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, ८० हून अधिक जण बेपत्ता आहेत.
म्यानमारमध्ये वाहतूक ठप्प, ऐतिहासिक पूल कोसळला भूकंपामुळे म्यानमारमधील अनेक रस्त्यांना भेगा पडल्या असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. मंडाले आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी धावपट्टीवरच बसून राहिले. याशिवाय, १९३४ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक पूलही कोसळला आहे.
चीनपर्यंत बसले धक्के चिनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, या भूकंपाचे धक्के चीनच्या युन्नान आणि सिचुआन प्रांतातही जाणवले. सीमावर्ती रुईली शहरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
‘रेड क्रॉस’च्या मदतकार्यात अडथळे ‘रेड क्रॉस’च्या पथकांना वीज नसल्याने मंडाले, सागाईंग आणि दक्षिणेकडील शान राज्यात मदत पोहोचवताना अडचणी येत आहेत. म्यानमारमध्ये यादवी सुरू असल्याने मदत कार्याची अंमलबजावणी कशी होईल, याबाबत अनिश्चितता आहे.
या महाभयंकर भूकंपामुळे दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.