केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ.

24 प्राईम न्यूज 29 मार्च 2025
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीनंतर महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के झाला आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू करण्यात आली असून, जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीसाठी असेल.
सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला असून त्याच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्त्यात सहामाही तत्त्वावर वाढ केली जाते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. त्या वेळी ३ टक्क्यांची वाढ झाली होती, तर आता २ टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.
सरकारने मार्च महिन्यात वाढ जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकबाकीचे भत्तेही मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १९,००० रुपये असेल, तर त्याला आधी १०,०७० रुपये महागाई भत्ता मिळत होता. नव्या २ टक्के वाढीनंतर हा भत्ता १०,४५० रुपये होईल, म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३८० रुपयांची वाढ होणार आहे.