डॉ. उमाकांत पाटील: जिद्द, मेहनत आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास

आबिद शेख/ अमळनेर
पिंप्री गावातील डॉ. उमाकांत भरत पाटील यांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उच्च शिक्षण घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.
त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले आणि सर्वोदय माध्यमिक विद्यालयातून दहावीचे शिक्षण घेतले. शिक्षणाच्या प्रवासात महाजन सर, विलास सर, आर.एन. पाटील सर, व्ही.एस. पाटील सर आणि अन्य दिग्गज शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. पुढे प्रताप महाविद्यालयातून बारावी ते एम.एस्सी. पूर्ण करताना अनुभवी प्राध्यापकांचे सहकार्य त्यांना मिळाले.
डॉ. उमाकांत पाटील यांनी प्रतिष्ठित Institute of Chemical Technology, माटुंगा, मुंबई येथून पीएच.डी. पूर्ण केली. शिक्षणाच्या या प्रवासात डॉ. जयश्री नगरकर आणि इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांच्या यशात मोलाचे ठरले. त्यांनी दहा आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदा अटेंड केल्या.
त्यांनी Novartis Pharma आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत मोठा अनुभव मिळवला. सध्या ते बंगळुरू येथे Oncology Research and Development Department मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. उमाकांत पाटील यांचा हा प्रवास गावातील व पंचक्रोशीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उच्च शिक्षण आणि करिअरसाठी ते अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते नेहमी मदतीला तत्पर असलेल्या व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या आशीर्वादाला, पत्नीच्या साथीला आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला जातं.