अमळनेर येथे अहिराणी साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठी तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनात अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडे विविध मागण्यांचे ठराव मांडण्यात येणार आहेत.

३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या या संमेलनात अहिराणी कथा-कवितांचा मराठी अभ्यासक्रमात समावेश करावा, अहिराणी साहित्य प्रकाशनासाठी विशेष अनुदान द्यावे, तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी अभ्यास केंद्र स्थापन करावे, अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

संमेलनाचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले करणार आहेत. संमेलनाच्या मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार सदाशिव अण्णा माळी प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे प्रयत्न सुरू आहेत.
३० मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता बळीराजा स्मारकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाप्रकार, सजवलेले रथ, महिला पथक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संमेलन परिसरात मदतीसाठी स्कॅनर कोड लावण्यात आले असून नागरिक उत्स्फूर्तपणे योगदान देत आहेत. संमेलनाच्या आयोजनासाठी १०० सदस्यांची समिती कार्यरत आहे.
