अमळनेरमध्ये ईद उल फितर साजरी; काळ्या फिती लावून वक्फ विधेयकाचा निषेध.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात ईद उल फितरच्या पवित्र पर्वावर अमन आणि शांतीचे वातावरण राहो, तसेच सर्वधर्मीय बांधवांमध्ये भाईचारा प्रस्थापित व्हावा, अशा शुभेच्छांसह आज सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गांधलीपूरा येथील ईदगाह मैदानावर आज (सोमवार) सकाळी ८ वाजता मौलाना नौशाद आलम यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाजेनंतर सर्वांनी देशात कायम शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी प्रार्थना केली. तसेच उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील, उपअधिक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, नपा मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राजू संधानशिव आदी मान्यवर उपस्थित होते.
काळ्या फिती लावून वक्फ संशोधन विधेयकाचा विरोध
यावर्षी नमाज अदा करताना मुस्लिम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या वक्फ संशोधन विधेयक २०२४ चा विरोध नोंदवला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्देशानुसार हा शांततापूर्ण निषेध करण्यात आला.
नमाजेनंतर अनेकांनी कब्रिस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी दुआ अर्पण केली. शहरभरात ईदचा उत्साह दिसून आला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत शीरखुर्म्याचा स्वाद घेतला.