सर्वोच्च न्यायालयाचा उत्तर प्रदेश सरकारला दणका : बुलडोझर कारवाईबाबत १० लाखांची भरपाई देण्याचे आदेश..

24 प्राईम न्यूज 2 April 2025
प्रयागराजमध्ये बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला मोठा झटका देत प्रयागराज विकास प्राधिकरणाला पाच याचिकाकर्त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने नमूद केले की, नोटीस मिळाल्यानंतर अवघ्या २४ तासांत घर पाडणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. योगी सरकारने २०२१ पासून प्रयागराजमध्ये बुलडोझर कारवाई सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर, एक वकील, एक प्राध्यापक आणि तीन महिला यांच्या घरांवर झालेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
अस्वस्थ करणारे दृश्य
सुनावणीदरम्यान, न्या. उज्ज्वल भूयान यांनी उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधील अतिक्रमणविरोधी मोहिमेतील एका घटनेचा उल्लेख केला. २४ मार्च रोजी झोपड्यांवर बुलडोझर चालवला जात असताना एका ८ वर्षांच्या मुलीला तिची पुस्तके घेऊन धावत जाण्याची वेळ आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, न्यायालयाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या आदेशामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या बुलडोझर कारवाईवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.