खोल मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचे तरुणांनी वाचवले प्राण..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे एका मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला तेथील तरुणांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगरूळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीत २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सात ते आठ महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडलेले कल्पेश पाटील यांनी पाहिले. त्यांनी तातडीने ही माहिती सरपंच समाधान पारधी यांना दिली. त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कळवण्यात आले. त्यांनी वनविभागाच्या पथकाला पाठवले.
मात्र, तत्पूर्वीच मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाणे आणि धनंजय हिलाल पाटील यांनी कोणतीही भीती न बाळगता विहिरीत उड्या मारल्या. विहिरीत खोल पाणी होते आणि कठडे मोडकळीस आले होते. दोघांनी हरणाला पकडले. त्यावेळी सरपंच समाधान पारधी, दिनेश पाटील, अशोक गोकुळ पाटील, शुभम धनगर, अनिल चव्हाण, कल्पेश पाटील, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील यांनी दोर सोडून हरणाला आणि त्या दोघा तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
हरीण पडल्याने किरकोळ जखमी झाले होते. वनरक्षक पी. जे. सोनवणे, रामदास वेलसे, वनमजूर मयूर पाटील, समाधान पाटील यांनी हरणाला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉ. संदेश वाटोळे यांनी उपचार करून ते जंगलात सोडले.
दरम्यान, तालुक्यातील आमोदा येथे मच्छींद्र ताथुराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत दोन ते तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडून पाण्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन-तीन दिवसांपासून पाणी शोधत फिरताना ते विहिरीत पडले असावे.
यासंदर्भात वनरक्षक पी. जे. सोनवणे यांनी शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आणि विहिरींना कठडे अथवा झाकण लावण्याचे आवाहन केले आहे.