अमळनेरच्या अंबर्षी टेकडीला भीषण आग: २५ हजार झाडे भस्मसात, पर्यावरणाला मोठा धोका..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहराचे वैभव असलेल्या अंबर्षी टेकडीला आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीने सुमारे २५ हजार झाडे भस्मसात झाली. ही दुर्घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि तब्बल साडे तीन तास आगीचे तांडव सुरू होते. या घटनेमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचली असून, स्थानिक पर्यावरणप्रेमींनी याआधीही टेकडीवर वारंवार लागणाऱ्या आगीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी व त्यांच्या पथकाला दोन मोठे आणि एक लहान बंब तसेच आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळी पाठवले. अग्निशमन दलाच्या जवानांसह अंबर्षी टेकडी ग्रुपचे सदस्य आणि महिला हाऊसिंग ट्रस्टच्या महिलांनी अथक प्रयत्न करत अखेर साडे तीन तासांनी आग आटोक्यात आणली.
आगीची सुरुवात हनुमान टेकडीकडून झाली आणि ती नक्षत्र वन, अमृत वन, रोटरी वन, आयएमए वन या भागांपर्यंत पसरली. टेकडीवर सुमारे ४५ हजार झाडे लावण्यात आली असून, तिथे विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी आणि अन्य वन्यजीवांचा वावर वाढला होता. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी येथे गवत तसेच ठेवण्यात आले होते.
या टेकडीच्या संवर्धनासाठी शहरातील अनेक नागरिकांनी योगदान दिले आहे, आणि टेकडी ग्रुपने नियमित देखभाल केली आहे. मात्र, या आगीत सुमारे ५० ते ६० टक्के भाग जळून खाक झाला असून, ५ हजार पिंपळाच्या झाडांसह एकूण २५ हजार झाडांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी वारंवार घडणाऱ्या या घटनांमागील कारणांची चौकशी करून कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.