वक्फ विधेयकावर घमासान : सत्ताधारी-विरोधक आमनेसामने..

24 प्राईम न्यूज 3 April 2025
नवी दिल्ली – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करताच जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विधेयकावरून तीव्र मतभेद दिसून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर वक्फ बोर्डावरून गैरसमज पसरवण्याचा आणि अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवण्याचा आरोप केला. तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक ‘फोडा आणि राज्य करा’ या केंद्र सरकारच्या धोरणाला चालना देणारे असल्याचे म्हटले.
शिवसेना (उबाठा) संभ्रमात
सुमारे आठ तासांच्या चर्चेनंतरही विरोधक संतुष्ट नसल्याने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेसाठी अतिरिक्त वेळ दिला. रात्री उशीरापर्यंत विधेयकावरील मतदान अपेक्षित होते. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेमकी कोणती भूमिका घेणार, याबाबत संभ्रम कायम होता.
वक्फ म्हणजे काय?
वक्फ हा अरबी भाषेतील ‘वक्फा’ या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘राखून ठेवणे’ असा होतो. ऐतिहासिक संदर्भानुसार, खलिफा उमर यांनी खैबरमधील जमिनीसंदर्भात इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यांनी ती जमीन गरीबांच्या आणि धार्मिक कार्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला. वक्फ मालमत्ता विक्रीस, भेटवस्तूसाठी किंवा वारसाहक्काने हस्तांतरणास पात्र नसते. भारतात इस्लामी राजवटीच्या काळात वक्फ मालमत्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.
विधेयकाचे महत्त्व
हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित असून, यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. मात्र, विरोधक या विधेयकाला अल्पसंख्याकांविरोधी म्हणून विरोध करत आहेत, तर सरकार हे विधेयक पारदर्शकतेसाठी आवश्यक असल्याचा दावा करत आहे.