माजी आमदारांचा नगरपालिकेवर हल्लाबोल – विकासकामांची आकडेवारी जाहीर..

0

आबिद शेख /अमळनेर -अमळनेर नगरपालिकेवर प्रशासकांची सत्ता आल्यापासून शहरातील पथदिवे आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहेत. थकीत वीजबिलामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांची आकडेवारी जाहीर करत प्रशासनाची तुलना केली असून, या खुलाश्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापले आहे.

विजेच्या थकबाकीचा गंभीर प्रश्न

माजी आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत नगरपालिकेने नियमितपणे १४.६७ कोटी रुपये वीजबिल भरले. याशिवाय, २००३ ते २०१६ या कालावधीत जमा झालेल्या थकबाकीतील ७.७३ कोटी रुपयेही त्यांच्या कार्यकाळात भरले गेले. त्यामुळे एकूण २०.३९ कोटी रुपये वीजबिलाच्या रूपाने अदा करण्यात आले.

परंतु, २०२२ ते २०२५ या प्रशासकीय कार्यकाळात थकबाकी प्रचंड वाढली असून, जळोद, गांधली आणि कुलाली (डोह) पंपहाऊसचे एकत्रित थकबाकीचे आकडे ३२.१४ कोटी रुपये इतके झाले आहेत. याशिवाय, बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी ३.९२ कोटी रुपये, तर पथदिव्यांचे थकित वीजबिल ८२.१८ लाख रुपये आहे.

“तुलना करा, अवहेलना करू नका” – माजी आमदारांचा घणाघाती आरोप

माजी आमदार पाटील यांनी प्रशासनावर टीका करताना म्हटले की, “आमच्या कार्यकाळात सातत्याने वीजबिल भरले जात होते, त्यामुळे पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचा प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहर अंधारात जात आहे आणि नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.”

नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर रोष व्यक्त करत त्यांनी पुढे म्हटले, “तुलना करा, अवहेलना करू नका,” असे सांगत विकासकामांच्या आकडेवारीवर भर दिला.

नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

या आकडेवारीनंतर शहरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांनी प्रशासकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जर मागील कार्यकाळात नियमित वीजबिल भरले जात होते, तर आता एवढी थकबाकी कशी काय?” असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!