संभाजी देवरे यांचा अहिराणी साहित्य संमेलनात सन्मान..

आबिद शेख/ अमळनेर
“घर संसार” या अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता आणि लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचा अहिराणी साहित्य संमेलनात गौरव करण्यात आला. अमळनेरमध्ये आयोजित या संमेलनात त्यांना त्यांच्या सिनेमा, पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संभाजी देवरे यांच्या कार्याची प्रशंसा करताना अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी सांगितले की, “अमळनेरच्या साहित्यप्रेमींनी या संमेलनाला दिलेल्या प्रतिसादामुळे त्याची गोडी अधिक वाढली आहे. या कार्यक्रमामुळे अमळनेर हे एक सांस्कृतिक विद्यापीठ ठरले आहे.”
या संमेलनात स्वागताध्यक्ष डी.डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, के.डी. पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आमदार अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, सचिव प्रभाकर शेळके, डॉ. डिगंबर महाले, रणजित शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, प्रकाश महाले, गोकुळ बागुल, प्रकाश पाटील, रविंद्र पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
संभाजी देवरे यांच्या योगदानामुळे अहिराणी भाषेला नवा सन्मान मिळाल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांच्या पुढील सांस्कृतिक उपक्रमांकडून मोठ्या अपेक्षा असून, त्यांच्या यशाचा गौरव सर्वत्र होत आहे.