वक्फ वाचवा, संविधान वाचवा: एकता संघटनेची मौलाना उमरेन यांच्याशी चर्चा; लोकशाही मार्गाने लढा सुरूच ठेवणार

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव | राष्ट्रपतींकडून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभरात याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकता संघटनेचे प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन महेफुझ रहमानी यांची दिल्ली येथे भेट घेण्यासाठी गेले होते. यामध्ये मुफ्ती खालिद, फारुख शेख, मौलाना रहीम पटेल, अनीस शाह आणि ताहेर शेख यांचा समावेश होता.

या प्रतिनिधींनी मौलाना उमरेन यांच्याशी सुमारे ५५ मिनिटे चर्चा केली. या चर्चेचा मुख्य उद्देश वक्फ संपत्तीचे रक्षण आणि भारतीय संविधानाचे संरक्षण हा होता. या दरम्यान मौलाना उमरेन यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनांनुसार काम करण्याचे मार्गदर्शन दिले.
एकता संघटनेने स्पष्ट केले आहे की जळगाव शहर आणि जिल्ह्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संघटनांना बरोबर घेऊन लवकरच ‘जेल भरो’ आंदोलन सुरू करण्यात येईल.
यासंदर्भात एकता संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “धैर्य आणि संयम राखून, पूर्णपणे लोकशाही मार्गाने वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला जाईल.” या पत्रकावर मुफ्ती खालिद, मौलाना रहीम पटेल, फारुख शेख, अनीस शाह, मौलाना तौसिफ शाह, मजहर खान, अन्वर खान, मतीन पटेल, कासिम उमर, इम्रान शेख, सईद शेख, सलीम इनामदार, युसूफ खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.