महागाईचा स्फोट: घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

24 प्राईम न्यूज 8 April 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत ५०३ रुपयांवरून ५५३ रुपयांवर गेली आहे. तर सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांवर पोहोचली आहे.
विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, निवडणूक नसताना दरवाढ केली जाते आणि निवडणूक जवळ आल्यावर दर कमी करून जनतेची दिशाभूल केली जाते. याच रणनीतीनुसार केंद्र सरकारने सध्या सिलिंडर दरवाढ केली असून, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा महिने असताना ही कृती हेतुपुरस्सर असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, गॅस कंपन्यांना झालेल्या ४३ हजार कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक होती. दर दोन ते तीन आठवड्यांनी या दरांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित बिघडणार असून महागाईत अधिकच भर पडणार आहे.