महावीर जयंतीनिमित्त डि.आर.कन्या शाळेत पक्षांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील डि.आर.कन्या शाळेत करुणा क्लबच्या वतीने महावीर जयंतीचे औचित्य साधून पक्षांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थिनींनी घरच्या घरी असलेल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून सुंदर अशा पक्षांच्या घरट्यांची निर्मिती केली. या उपक्रमात चाळीसहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
निर्मिती केलेली घरटी शाळेच्या परिसरातील झाडांवर लटकवण्यात आली असून, त्यामुळे पक्ष्यांसाठी निवारा उपलब्ध झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धन व प्राणी कल्याणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
भगवान महावीर यांच्या करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूपतेच्या शिकवणीचा अनुभव विद्यार्थिनींनी या माध्यमातून घेतला. या उपक्रमात शाळेचे चेअरमन सी.ए. नीरज अग्रवाल, मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन करुणा क्लबचे डी.एन. पालवे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका आर.एस. सोनवणे, बी.एस. पाटील, एस.एस. वाघ यांचीही उपस्थिती लाभली.
या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिपाई बंधू-भगिनींनी सहकार्य केले. शाळेतील शिपाई बंधू सुट्टीच्या कालावधीत पक्ष्यांसाठी घरट्यांमध्ये दाणे व पाणी ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.