अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उत्साहाचा शिखर; सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल..

आबिद शेख/अमळनेर

– अमळनेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळी 7 वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी केदार बारबोले, माजी नगरसेवक नरेंद संदानशिव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यानंतर सकाळी 9 वाजता भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत तरुण, महिला व विविध सामाजिक संघटनांचा सहभाग लाभला.
सायंकाळी डॉ. आंबेडकर चौकात आयोजित जयंती उत्सवात शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, घोषणांनी शहरभर आनंदाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.