सुरू झाले नवे क्रांती पर्व – लीलाताई पाटील स्मारकाचे जनतेच्या हस्ते लोकार्पण..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर, 14 एप्रिल 2025 – भारताच्या संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज अमळनेर शहरात इतिहासात नोंद न झालेल्या पण स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या लीलाताई उत्तमराव पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचे लोकार्पण जनतेच्या हस्ते करण्यात आले.
ढेकू रोड परिसरात उभारण्यात आलेले हे स्मारक अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते. मंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती न मिळाल्यामुळे आणि श्रेयवादामुळे हा सोहळा वारंवार लांबणीवर पडत होता. अखेर पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी पुढाकार घेत, या स्मारकाचे लोकार्पण सामान्य जनतेच्या उपस्थितीत पार पाडले.
घोरपडे यांनी सांगितले की, “ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले, त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी सत्तेवर असलेल्या व्यक्तीची गरज नाही. साने गुरुजींच्या विचारसरणीवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे स्मारक लोकांसाठी खुले करणे, हीच खरी आदरांजली आहे.”
स्मारकावरील कुलूप स्वतः नागरिकांनी फोडले आणि गोणपाटाने झाकलेले अर्धपुतळे उघड करत स्मारकाला जिवंतपणा दिला. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकी सूर्यवंशी, सेवा दलाचे भागवत गुरुजी, शरद पाटील, अशोक बाविस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
घोरपडे यांनी 26 एप्रिल रोजी अमळनेर येथून डांगरीपर्यंत पदयात्रेची घोषणाही यावेळी केली, ज्यात लीलाताईंच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा जागर करण्यात येणार आहे.