डॉ. बी.एस. पाटील यांना “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – तालुक्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ फिजिशियन डॉ. बी.एस. पाटील यांना धुळे जिल्हा एम.डी. फिजिशियन असोसिएशनतर्फे सन 2025 चा “जीवनगौरव” पुरस्कार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले.
डॉ. पाटील यांनी सन 1973 पासून एम.डी. फिजिशियन म्हणून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी वैद्यकीय सेवेतील योगदान थांबवले नाही. धुळे आणि अमळनेर येथे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. कमीत कमी खर्चात रुग्णांना दर्जेदार सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख समाजात वेगळीच ठरली आहे.
आज 52 वर्षांनंतरही ते अविरतपणे रुग्णसेवेत कार्यरत असून त्यांचा हा आदर्श इतर वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सेवेसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.