छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाकडून दोन महागड्या बुलेट जप्त. – जळगाव पोलिसांची यशस्वी कारवाई

24 प्राईम न्यूज 20 April 2025
दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी मा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक तरुण चोरीची महागडी बुलेट विक्रीसाठी अजिंठा चौफुली, जळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून गुन्हे शोधपथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोका गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी यांना तत्काळ कारवाईसाठी पाठवण्यात आले.
सदर पथकाने अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचत संशयित तरुणाला लाल रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या बुलेटसह अटक केली. चौकशीत त्याने आपले नाव साजिद खान शकील खान (रा. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्याच्याकडे वाहनाचे कोणतेही कागदपत्र नसल्याने बुलेटचे चेसीस नंबर तपासण्यात आले. त्यावरून ही बुलेट पुणे येथून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस कस्टडी दरम्यान साजिदने अजून एक चोरीची महागडी YEZDI ROADSTER बुलेट देखील पोलिसांच्या ताब्यात दिली. एकूण दोन बुलेट्स, अंदाजे किंमत रुपये 2.5 लाख हस्तगत करण्यात आल्या आहेत. या संदर्भात चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे आणि सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीला संबंधित पोलीस ठाण्यांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोहेका गणेश शिरसाळे करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.