पूर्वपरवानगी शिवाय खोदकाम; मुख्य जलवाहिनीला फटका – लाखो लिटर पाणी वाया, अर्धे शहर तहानले..

0


आबिद शेख/अमळनेर

जिओ कंपनीसाठी केबल टाकण्याच्या कामादरम्यान ठेकेदाराने नगरपरिषदेची पूर्वपरवानगी न घेता खोदकाम सुरू केल्याने अमळनेर शहरात मोठा जलसंकट निर्माण झाले आहे. मुंदडा नगर भागातून जाणारी २५० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी जेसीबी मशीनच्या धक्क्याने फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. परिणामी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर बराच वेळ पाण्याचे कारंजे उडत होते. ठेकेदाराने झाकण्याचा प्रयत्न केला असला तरी तोपर्यंत पाईपलाइनमधील सर्व पाणी रस्त्यावर वाहून गेले. मुंदडा नगरमधील रस्ता नदीसारखा वाहत होता. हीच जलवाहिनी शहरातील काही पाण्याच्या टाक्यांना जोडलेली असल्याने त्या भागातील पाणीपुरवठाही थांबला आहे.

या भागात यापूर्वीही खोदकामामुळे जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळीही नागरिकांना तब्बल १२ ते १५ दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागले होते. आता पुन्हा त्याच संकटाची पुनरावृत्ती झाली आहे.

या प्रकरणावर नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले, “जिओ कंपनीची केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने आमची परवानगी न घेता खोदकाम केले. त्यामुळे हा प्रसंग ओढवला. जेसीबी मशीन जप्त करण्यात येईल. परवानगी घेतली असती, तर आमचे अभियंते उपस्थित राहिले असते आणि नुकसान टळले असते. भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!