आधी लग्न वक्फ कायद्याचे, नंतर माझे! — नवरदेव साकिब यांची रोखठोक भूमिकावक्फ बचाव समितीचा अनोखा उपक्रम: लग्न समारंभातच जनजागृती मोहीम..

24 प्राईम न्यूज 21 April 2025
सध्या संपूर्ण देशभरात व विशेषतः मुस्लिम समाजात वक्फ कायदा २०२५ च्या विरोधात जनजागृतीचा आवाज बुलंद होत आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरू असून जळगाव जिल्ह्यातही वक्फ बचाव समितीच्या माध्यमातून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथे एक वेगळाच दृश्य पाहायला मिळाले. खंडवा येथील अब्दुल अझीझ हे आपल्या मुलगा साकिब यांच्या लग्नासाठी वरात घेऊन आले होते. साकिब यांचे लग्न उमर खय्याम यांच्या कन्या अलिमुन्निसा यांच्यासोबत होत होते.
परंतु या पारंपरिक सोहळ्यात काहीसं वेगळं घडलं. वक्फ बचाव समितीचे मुफ्ती खालिद, फारुख शेख, सैयद चांद आणि अनिस शहा यांची उपस्थिती या समारंभात होती. त्यांनी संधी साधत उपस्थित पाहुण्यांना वक्फ कायद्याचे गंभीर परिणाम समजावून सांगितले. मस्जिद, कब्रस्तान, इदगाह, मदरसा यांच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती देताना, हा कायदा संविधानविरोधी आहे, असा दावा करत त्यांनी एकजूट होऊन त्याला विरोध करण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे, जेव्हा फारुख शेख यांचे भाषण सुरू असताना नवरदेव साकिब मंचाकडे येत होते, तेव्हा ते क्षणभर थांबले. पण नवरदेवाने त्यांना थांबवून म्हटले, “माझं लग्न उशिरा झालं तरी चालेल, पण माझ्या लग्नातील वराड्यांना वक्फ कायदा समजावं हे महत्त्वाचं आहे. आधी लगीन वक्फचं, नंतर माझं!“
त्याच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यानंतर तब्बल ३० मिनिटे फारुख शेख यांनी वक्फ कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
हा उपक्रम वक्फ बचाव समितीच्या जनजागृती मोहिमेला एक वेगळं परिमाण देणारा ठरला आहे.