अमळनेर मध्ये पाणीटंचाईचा मुद्दा चिघळला; १ मे रोजी मटका मोर्च्याचा इशारा – भाजपा शहराध्यक्ष विजयसिंग पंडित राजपूत.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. विजयसिंग पंडित राजपूत यांनी यासंदर्भात नगरपरिषदेला लेखी विनंती केली आहे. दोन दिवसांच्या खंडानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विनंती पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, शहरातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरतात आणि विलंब झाल्यास दंड देखील भरतात. मात्र, सध्या सहा दिवसांनी एकदाच पाणी दिले जात असल्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या कामात नियोजनाचा अभाव असून, यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमळनेरचा यात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्या काळात पाण्याची गरज अधिक असते. तापी नदीत पाणीसाठा असूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल, हे दुर्दैवी असल्याचे राजपूत यांनी स्पष्ट केले.
जर येत्या ८-१० दिवसांत पूर्वीप्रमाणे नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर १ मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपालिकेवर मटका मोर्चा काढण्यात येईल व मटके फोडून निषेध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस नगरपरिषद जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.