क्रांतीपर्व स्मारक लोकार्पणाची मागणी तीव्र; जनतेत संतापाचा सूर…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील ठेकुसीम रोडवरील नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर उभारण्यात आलेले क्रांतीपर्व स्मारक आजही लोकार्पणाविना धुळखात पडून आहे. क्रांतीवीर उत्तमराव पाटील व क्रांतीविरांगना लीलाताई पाटील यांच्या क्रांतिकारी इतिहासाची साक्ष देणारे हे भव्य स्मारक महाराष्ट्र शासन व नगरपरिषद निधीतून उभारण्यात आले असून त्याचे सर्व बांधकाम पूर्ण झाले आहे.
मात्र, काही तथाकथित स्थानिक नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे या स्मारकाचे लोकार्पण लांबणीवर पडले असून, त्यामुळे स्मारकाची दुरवस्था होत आहे. उष्णता, वारा व पावसामुळे स्मारकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याची जनतेत भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक विवेक भिमराव पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत स्मारकाचे तात्काळ लोकार्पण करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दादासो अनिल भाईदास पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिता वाघ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात यावे, अशी केली आहे.
क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर उभा राहण्यासाठी हे स्मारक लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.