१० ग्रॅम सोन्याचा दर १.०२ लाखाच्या वर – चार महिन्यांत २९% वाढ..

सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दराने अखेर ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. मंगळवारी दिल्लीत १० ग्रॅम ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर तब्बल १८०० रुपयांनी वाढून १,०१,६०० रुपये झाला. तर ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर २८०० रुपयांनी वधारून १,०२,१०० रुपये नोंदवला गेला.
लग्नसराई आणि येणाऱ्या अक्षय तृतीयेमुळे देशभरात सोन्याच्या मागणीला जोरदार चालना मिळाली आहे. यावर्षी अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी असून, त्यादिवशी सोने खरेदीची परंपरा असल्यामुळे ग्राहकांची उसळलेली गर्दी दिसत आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
चार महिन्यांत २२,६५० रुपयांची वाढ
डिसेंबर २०२४ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर सुमारे ७८,००० रुपये होता. गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या दरात २९ टक्क्यांची वाढ झाली असून, त्यात २२,६५० रुपयांचा उड्डाण आहे.
दरम्यान, चांदीच्या दरात मात्र विशेष बदल झालेला नाही. मंगळवारी चांदीचा दर किलोला ९८,५०० रुपये इतका होता.