अमळनेरमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड – दोन आरोपींवर गुन्हा दाखल

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील जयदीप ऑटो गॅरेजच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर करून चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरण्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींवर कारवाई केली.
रामेश्वर नगर येथील जयेश संजय साळी आणि चंदन प्रल्हाद साळी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २० गॅस सिलेंडर, गॅस रिपेरिंग मशीन व इतर साहित्य असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद संदानशिव यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.