साने गुरुजी विद्यालयात जागतिक पुस्तक दिन आणि वसुंधरा दिन उत्साहात साजरे..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात जागतिक पुस्तक दिन व वसुंधरा दिन संयुक्तरीत्या साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पार्लरच्या संचालिका दर्शनाताई पवार आणि मुख्याध्यापक सुनील पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली, ज्यात मुख्याध्यापक पाटील यांनी विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या पुस्तक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयीचे महत्त्व अधोरेखित करत चांगले वाचन समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवते, असे सांगितले.
प्रमुख पाहुण्या दर्शनाताई पवार यांनी पुस्तकांची रचना, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, प्रस्तावना आणि छपाई प्रक्रियेबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्यानंतर त्याचा सारांश लिहावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी वाचनामुळे समाधानी, आनंदी आयुष्य जगता येते, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात संदीप घोरपडे यांनी चांगल्या व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी वाचनाची गरज आहे, असे सांगून अण्णाभाऊ साठे, बहिणाबाई चौधरी यांसारख्या लेखकांनी समाजपरिवर्तनासाठी पुस्तक हे माध्यम निवडल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.ए. धनगर यांनी केले.