मुंबईतील जैन मंदिर तोडफोड व पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जैन समाजाकडून तीव्र निषेध..

आबिद शेख/ अमळनेर
दि. २४ एप्रिल २०२५ रोजी समस्त जैन बांधवांच्या वतीने महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून मुंबईतील जैन मंदिर तोडल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यासोबतच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील जैन समाजाने निषेध व्यक्त केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज हा अहिंसावादी आणि शांतीप्रिय असूनही वारंवार त्यांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटना घडत आहेत. मुंबईच्या विलेपार्ले भागातील जैन मंदिर महानगरपालिकेकडून पाडण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण समाजामध्ये असंतोष आहे. तसेच, साधू-संतांच्या यात्रांदरम्यान सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
जैन समाजाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
साधू-संतांवर होणारे हल्ले थांबवून त्यांच्या प्रवासात सुरक्षा द्यावी.
प्रवासादरम्यान अपघात होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
विलेपार्लेतील मंदिराच्या जागेवर पुन्हा मंदिर उभारण्यात यावे.
धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण थांबवण्यासाठी विशेष कायदा करावा.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करावी.
शासनाने जैन समाजाच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सामूहिक मागणी समस्त जैन बांधवांनी केली आहे.राजकुमार छाजेड, महेन्द्र लाल कोठारी,डॉ. रवीद्र जैन घेवरचेदनी कोठारी, प्रवीण रामलाल जैन, विजय स्वरुपचंद जैन, डॉ. संजय शहा, संजय गोलेच्छा, राजेद्र चंपालाल जैन ,प्रा अरुण कोचर, प्रा. एस. डी. ओसवाल ,प्रकाश छाजेड, महावीर पहाडे, जितेंद्र जैन,आदी जैन बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.