अमळनेर तालुक्यात महिला सरपंच आरक्षणासाठी नवीन सोडत; आज -नगर परिषद सभागृहात प्रक्रिया..

आबिद शेख/अमळनेर
– अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी २१ एप्रिल रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे आरक्षण सोडत पार पडली होती. मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण प्रक्रियेत तांत्रिक चूक झाल्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी नव्याने सोडत घेण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, त्या ग्रामपंचायती ज्या नामनिर्दिष्ट (सर्वसाधारण) व सर्वसाधारण प्रवर्गात चुकून समाविष्ट झाल्या होत्या, त्यांची महिला सरपंच आरक्षणासाठी पुन्हा सोडत घेण्यात येणार आहे. त्यामुळे २१ एप्रिल रोजी महिला सरपंच म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
सदर पुन:सोडत उद्या, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे पार पडणार आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व नागरीक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी या सोडतीस उपस्थित राहावे, असे तहसील कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे.