ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचे आज लोकार्पण; ७७ लाखांच्या निधीतून स्मारक साकार..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – नगरपरिषद प्रभाग क्र. ७ मधील जय हिंद कॉलनी येथे ७७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या क्रांतिकारक डॉ. उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या क्रांती पर्व स्मारकाचे लोकार्पण आज २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे स्मारक झाकलेले असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. स्मारक उघडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. काहींनी या विषयावरून वेगळी चर्चा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर, थोर क्रांतिकारकांचे स्मारक झाकून ठेवणे हे अपमानास्पद असल्याचे मत व्यक्त होत होते.
या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेने स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला असून, आ. अनिल पाटील यांच्या शुभहस्ते आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
नगरपरिषदेतर्फे सर्व नागरिक, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांना या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.