अमळनेर मध्ये वीज आणि पाण्याचा लपंडाव; ग्राहक पंचायतने अधिकाऱ्यांना दिलं निवेदन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात वीज आणि पाण्याच्या असंख्य समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर शाखेच्या वतीने महावितरण व नगरपरिषद यांना निवेदन देत नागरिकांच्या व्यथा मांडण्यात आल्या.
महावितरणच्या उपविभाग क्र. १ च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. नेमाडे साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शहरातील विविध भागांत उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांवरील कामांसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. परिणामी नागरिकांना पाण्यासह घरगुती उपकरणांचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वयोवृद्ध, गृहिणी आणि बालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. ग्राहक पंचायतने याबाबत तक्रार स्वरूपात सूचित करत सांगितलं की, कार्यालयात संपर्क साधल्यास फोन बंद किंवा प्रतिसाद न मिळाल्याची वेळोवेळी तक्रार आली आहे.
त्याचबरोबर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शहरातील मुंदडा नगर, लक्ष्मीनगर यांसारख्या भागांत जलवाहिनी फुटी व अनियमित पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं नमूद केलं आहे. पाणी मिळत नसतानाही नियमित कर वसुली केली जाते व उशिरा भरणा केल्यास दंड आकारला जातो, यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद केलं आहे की, पाणी ही अत्यावश्यक सेवा असून यामध्ये होणारी विलंब व अनियमितता ही नागरी सेवेतील मोठी त्रुटी मानली जाते. नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय आगामी आर्थिक वर्षात कोणतीही लोकवर्गणी आकारली जाणार नसल्याचं पूर्वी दिलेलं आश्वासन यंदाच्या बिले देताना पाळावं, अशीही स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनप्रसंगी सौ. स्मिता चंद्रात्रे (अध्यक्ष), अॅड. सौ. भारती अग्रवाल (महिला प्रांत प्रमुख), सौ. वनश्री अमृतकर (सचिव), मकसूद बोहरी (जिल्हा पालक), विजय शुक्ल (जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख), सुनील वाघ (जिल्हा ऊर्जा प्रमुख), व सतीश देशमुख (जिल्हा उपसचिव) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बाबतची माहिती पी.आर.ओ. सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.