दहशतवाद्यांवर कारवाई! आदिलचं घर बुलडोझरनं जमीनदोस्त; आसिफचं घर बॉम्बस्फोटात उडवलं

24 प्राईम न्यूज 26 April 2025
पहलगामच्या वैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. सीमेवर दोन्ही देशांकडून सैन्याची हालचाल सुरू असून, भारतीय लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत सरकारने सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जलसंधारण मंत्री सी.आर. पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल हुसेन ठोकर गुरी यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर, तपास यंत्रणांनी दोघांच्याही विरोधात कारवाईला वेग दिला.
जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनंतनाग जिल्ह्यातील विजबेहरा भागातील आदिलच्या घरावर बुलडोझर चालवून त्याचे घर जमीनदोस्त केले. दुसरीकडे, आसिफ शेखच्या घरावर पोलीस पोहोचण्याआधीच अज्ञातांनी त्याच्या घरात आयईडी बॉम्बचा स्फोट घडवून आणला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये या कटाचा उगम फेब्रुवारी महिन्यात झाल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले असून, सध्या व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.