जेष्ठ नागरिकांसाठी सायबर गुन्हे जागृती कार्यशाळा, पोलिस निरीक्षक निकम यांचे मार्गदर्शन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर जेष्ठ नागरिकांना कोणी टवाळखोर त्रास देत असेल किंवा काही गैरप्रकार घडल्यास तातडीने ११२ या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले. पू. सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या भवनात पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित सायबर क्राईम जागृती कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. शिवाजीराव पाटील होते. या वेळी निरीक्षक निकम यांनी जेष्ठ नागरिकांना सायबर फसवणूक टाळण्याच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. “डिजिटल अरेस्ट” हा प्रकार बनावट असून पोलिसांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, सोशल मीडियावर टास्क देऊन होणाऱ्या लुबाडणुकीपासून सावध राहण्याचेही मार्गदर्शन केले. अनोळखी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल न उचलण्याचा सल्ला देत, ओटीपी मागण्याच्या फसवणुकीबाबतही जागरूक राहण्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीमध्ये १५ मिनिटांत मदत पोहोचवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनामुळे जेष्ठ नागरिकांच्या मनातील भीती दूर झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा सावधगिरीने वापर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना “साहित्य भूषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर राजेंद्र नवसारीकर, एस. एम. पाटील, उमाकांत नाईक, कृष्णा पाटील, श्रावण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला भाऊराव पाटील, देविदास बिरारी, पवार, श्रीमती चौधरी, प्रा. शिवाजी पाटील, नारायण पाटील, ए. डी. पाटील, प्रकाश पाटील, हेमंत पाटील, वाघ यांच्यासह सुमारे १५० जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नवसारीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एम. पाटील यांनी मानले.