वाहन चालवताना हेडफोन वापरल्यास कारवाई; २८ एप्रिलला निर्णय..

24 प्राईम न्यूज 29 April 2025
वाहन चालवताना हेडफोन वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२८ एप्रिल) होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक आता संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी खुला करण्यात येणार आहे, जेणेकरून अशा घटना थेट नोंदवल्या जाऊ शकतील.
अलीकडे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांकडून हेडफोन घालून चित्रपट, रिल्स किंवा क्रिकेट सामने पाहण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. विशेषतः, २२ मार्च रोजी मुंबई-पुणे महामार्गावर एसटीच्या शिवनेरी बसचा चालक क्रिकेट सामना पाहताना आढळला होता. एका प्रवाशाने हे चित्रण करून प्रत्यक्ष मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठवले होते. त्यानंतर तातडीने कारवाई करत त्या चालकाला निलंबित करण्यात आले आणि संबंधित खासगी कंत्राटदारावर पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश एक महिन्यांपूर्वीच देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले जाणार आहे.
प्रवाशांनी जर वाहनचालकाचा हेडफोन घालून वाहन चालवतानाचा फोटो किंवा व्हिडिओ आरटीओ कार्यालयाकडे पाठवला, तर त्यावर तातडीने कारवाई करणे शक्य होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
“प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही,” असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.