अमळनेरमध्ये पावसाळ्यापूर्वी नाले सफाईला गती; नगरपालिकेची नागरिकांच्या आरोग्याची काळजी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अमळनेर नगरपालिकेने शहरातील नाले सफाई मोहीम वेगात सुरू केली आहे. दोन जेसीबीच्या मदतीने एकूण १८ नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे.
शहरातील पिपऱ्या नाला, धुळे रोड, विप्रो नाला, पिंपळे रोड, ढेकू रोड अशा प्रमुख ठिकाणी मोठे आणि लहान मिळून एकूण १८ नाले आहेत. यामध्ये आठ मोठ्या व दहा लहान नाल्यांचा समावेश आहे. वर्षभरात या नाल्यांमध्ये अंदाजे ४०० टन गाळ साचतो, त्यामुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून रस्ते, वसाहती व कॉलन्यांमध्ये घाण पाणी साचते. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन आरोग्य धोक्यात येते. पावसाळ्यात नाले सफाई करणे अवघड असल्याने नगरपालिकेने आगाऊ तयारी सुरू केली आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली अभियंता डिगंबर वाघ, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, आरोग्य समन्वयक गणेश गढरी तसेच मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, प्रवीण बिऱ्हाडे, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे आणि भरत आगळे यांच्या पथकाला नाले सफाईची जबाबदारी देण्यात आली आहे.
ढेकू रोड आणि आर. के. नगर पाठीमागील नाल्यांमध्ये सफाईस सुरुवात झाली आहे. ढेकू रोडवरील नाल्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या वनस्पतींची वाढ झाल्याने पाण्याचा प्रवाह अडवला गेला होता, त्यामुळे सफाईचे काम तातडीने राबवले जात आहे.
पावसाळ्यात विविध कॉलन्यांमध्ये पाणी साचून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे दीड महिना आधीच नाले स्वच्छ करून साचलेला गाळ भूमीभरावासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.