रा.से.यो स्वयंसेवक सागर कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा जळगाव जिल्हा युवा पुरस्कार..

24 प्राईम न्यूज 3 May 2025
– महाराष्ट्र दिनानिमित्त दिनांक 1 मे 2025 रोजी जळगाव येथील पोलिस मुख्यालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात रा.से.यो. स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा जळगाव जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सागरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रु. 10,000 असे आहे.
हा पुरस्कार दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो. सागर कोळी याने शिक्षण घेत असताना समाजसेवेशी नाळ जोडली आणि शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, बालविवाह निर्मूलन, तसेच आदिवासी आणि झोपडपट्टी भागातील जनजागृती या विविध विषयांवर सातत्याने कार्य केले.
सागरच्या कार्याची दखल घेऊन शासनातर्फे त्याला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या यशाबद्दल सागरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गौरव समारंभास जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.