जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

24 प्राईम न्यूज 4 May 2025
जळगाव, ३ मे – संभाव्य महापालिका निवडणुका व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे २०२५ या कालावधीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोले यांनी जारी केला आहे.
या आदेशानुसार, ३ मे रोजी पहाटे १२.०१ वाजेपासून १६ मे रात्री १२.०० वाजेपर्यंत पाच किंवा अधिक लोकांच्या जमावावर, सभा, मिरवणूक, शस्त्र बाळगणे, दाहक-स्फोटक पदार्थ ठेवणे, अस्थैर्य निर्माण करणारे साहित्य प्रसारित करणे किंवा वर्तन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
अलीकडील काही घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून, ८ ते १६ मे दरम्यान विविध सण, जयंती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक ठरल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यामध्ये वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी किंवा तत्सम सहाय्यक उपकरणे वापरणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांवर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. मात्र, यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.