अमळनेर यात्रोत्सवातील रथ मिरवणुकीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बदल. — परंपरा कायम, भक्तांना स्पर्शदर्शनाची सोय”

आबिद शेख/अमळनेर — पंढरपूर अमळनेर येथे दरवर्षी पार पडणाऱ्या संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला यंदा जवळपास तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सर्व जातिधर्मांना सामावून घेणारा आणि प्रत्येक घटकाला सन्मान देणारा हा एकमेव उत्सव महाराष्ट्रात ऐक्याचा संदेश पोहोचवत असतो.

संस्थानने यंदाही ही परंपरा कायम ठेवत रथ मिरवणुकीत एक किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येक भाविकाला रथाच्या जवळ येऊन दर्शन घेता यावे, प्रदक्षिणा घालता यावी, या हेतूने प्रारंभी दोराच्या सहाय्याने रथ ओढण्यात येणार असून नंतर रथ ट्रॅक्टरच्या साहाय्याने पुढे नेण्यात येणार आहे.
गर्दीत होणारी धक्का-बुक्की, महिलांना असुरक्षित वाटणे, खिसे कापणे, चेन स्नॅचिंग यासारख्या घटनांना आळा बसावा आणि पोलिस व सेवेकऱ्यांवरील ताण कमी व्हावा हा बदलाचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला व दिव्यांग भाविकांना देखील सहज दर्शन घेता येणार आहे. रथ स्थानावर पोहोचल्यावर पुन्हा दोराच्या सहाय्यानेच रथ स्थानावर नेण्यात येणार आहे.
संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, यात्रोत्सवात दिला जाणारा प्रत्येक समाजाचा सन्मान व मान पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून परंपरेत कोणताही बदल झालेला नाही.
सर्व भाविक भक्तांनी हा बदल समजून घ्यावा, भक्तीभावाने यात्रोत्सवाचा आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.