सुंदर माझी शाळा उपक्रमात पिंपळे आश्रम शाळेला प्रथम क्रमांक; जिल्हा पातळीवर गौरव..

आबिद शेख/अमळनेर

कळमसरे (ता. अमळनेर) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल (जि. जळगाव) अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ‘सुंदर माझी शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनुदानित विभागातून पिंपळे आश्रम शाळेने प्रथम क्रमांक तर लोहारा आश्रम शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपळे आश्रम शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री. अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय पाटील यांना 75 हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सन्मान प्रदान सोहळ्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार सौ. स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, व प्रकल्प अधिकारी अरुण पवार हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील, राजेंद्र लवणे, संदीप पाटील, तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद पाईकराव व विश्वास गायकवाड यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
या यशामुळे पिंपळे आश्रम शाळेच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत असून, संस्थेच्या अध्यक्ष सौ. विद्याताई पाटील, सचिव युवराज पाटील आणि ऍड. अभिजीत पाटील यांनीही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.