शिक्षणमहर्षी मौलाना ग़ुलाम वस्तानवी यांचे निधन: एक युग संपले!

आबिद शेख/ अमळनेर

गुजरातमधील सूरत जिल्ह्यात जन्मलेले आणि महाराष्ट्रातील अक्कलकुवा येथे आधुनिक व धार्मिक शिक्षणाचे केंद्र उभे करणारे मौलाना ग़ुलाम मोहम्मद वस्तानवी यांचे आज निधन झाले. शिक्षण, समाजसेवा आणि धार्मिक नेतृत्व यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे.

१९७९ साली अक्कलकुवा येथे ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम’ या संस्थेची स्थापना करून मौलानांनी अत्यंत अल्प स्रोतांपासून एका शिक्षणसम्राट संस्थेची उभारणी केली. त्यांनी धर्म आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधणारे शैक्षणिक मॉडेल उभे केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, बी.एड., डी.एड. यांसारख्या अभ्यासक्रमांसह धार्मिक शिक्षणाचे केंद्र म्हणून आज ही संस्था देशभरात ओळखली जाते.
दारुल उलूम देवबंद या प्रख्यात संस्थेचेही ते कुलगुरू राहिले होते. त्यांनी आयटी, सॉफ्टवेअर, ऑफिस मॅनेजमेंट अशा अनेक व्यावसायिक कोर्सेसच्या माध्यमातून मुस्लिम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण दिले. समाजासाठी हा त्यांचा मोठा वाटा होता.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य महान सर सैयद अहमद खान यांच्या खांद्याला खांदा लावणारे मानले जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय मुस्लिम समाजाने एक द्रष्टे शैक्षणिक नेते गमावले आहेत.
इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन…
अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौस नसीब करो. आमीन.